Monday , December 8 2025
Breaking News

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार

Spread the love

 

नवी दिल्ली : महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकामध्ये एकूण 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याचं समजतंय. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असेही सांगण्यात आले.

महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल
महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. आता त्यांची महाराष्ट्राच्या राजपालपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर झारखंडमध्ये राज्यपाल पदाचा पदभार संतोषकुमार गंगवार सांभाळणार आहेत.

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत?
६७ वर्षीय सी. पी. राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन हे दोन वेळा निवडून गेले. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती.

कोणकोणत्या राज्याला मिळाले नवीन राज्यपाल?

सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र

हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान

संतोषकुमार गंगवार – झारखंड

रमण डेका – छत्तीसगड

सी. एच. विजयशंकर – मेघालय

ओमप्रकाश माथूर – सिक्किम

गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड

लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)

जिष्णू देव वर्मा – तेलंगण

के. कैलाशनाथन – पुदुच्चेरी (उप राज्यपाल)

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *