नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अझरुद्दीनचे नाव पुढे आले आहे. ईडीने अझरुद्दीनला पहिला समन्स पाठवला आहे. त्याला गुरुवारी ईडीसमोर हजर व्हायचं होते पण त्याने जाणे टाळले त्याने हजर राहण्यासाठी वेळ मागितला, असे हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे. काही काळ मोहम्मद अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. 2019 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनची नियुक्ती हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी केली होती. पण दोन वर्षातच म्हणजे जून 2021 मध्ये हे पद सोडावे लागले होते. त्यावेळेस अझरुद्दीवर 20 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप होता. हे पैसे हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या डिझेल जनरेटर, अग्निशमन यंत्रणा आणि कॅनोपीसाठी देण्यात आले होते.
ईडीचा आरोपानुसार, एचसीएने खासगी कंपनीला स्टेडियमशी निगडीत कामे वाढीव दरात करण्याचा ठेका दिला. यामुळे क्रिकेट असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. ईडीने तेलंगानामध्ये 9 ठिकाणी छापेमारी केली होती आणि महत्त्वाचे दस्ताऐवज आणि डिजिटल उपकरणे जप्त केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुढच्या काळात आणखी गाजणार यात शंका नाही.