झांशी : उत्तर प्रदेश मधील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी नवजात शिशु विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर १६ बालकं गंभीर जखमी झाले आहेत. ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याचे समोर आले. आगीची घटना घडताच रुग्णालयात गोंधाळाची स्थिती निर्माण झाली. कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावत होते, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले. आगाची घटना घडली त्यावेळी रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ नवजात बालकं होती.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती झाशीचे जिल्हा अधिकारी अविनाश कुमार यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला, त्याशिवाय सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.