
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या मंडोरी जंगलातून मोठं घबाड हाती लागलं असून सोन्यांच्या बिस्कटांसह मोठी रोकड आयकर विभागाने जप्त केली आहे. येथील जंगलातून तब्बल 52 किलो सोनं आणि 11 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या घटनेनं भोपाळसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जंगलातील एका घराबाहेर लावारीसपणे आढळून आलेल्या कारमध्ये एवढी संपत्ती आढळून आली आहे. कारमधील या सोन्याची किंमत 40 कोटी 47 लाख रुपये एवढे आहे. आयकर विभागाचे अधिकारी देखील ही रक्कम आणि सोनं पाहून दंग झाल्याचं दिसून आले.
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये आयकर विभागाने धाड टाकून मोठी रक्कम आणि सोनं जप्त केलं आहे. भोपाळजवळील मंडोरे जंगलात एक बेवारस कार असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार, विभागाने जंगलातील कारवर छापा टाकला असता मोठं घबाड हाती लागलं आहे. त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे बिस्कीटे आणि रोकड आढळून आली. तब्बल 52 किलो सोनं आणि 9.86 कोटी रुपयांची रोकड आढळून आल्याने आयकर अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. इनोव्हा कंपनीच्या कारमधून ही संपत्ती ताब्यात घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयकर विभागाने रात्रीच्यावेळी छापा टाकून ही संपत्ती ताब्यात घेतली आहे.
आयकर विभागाच्या या कारवाईत 100 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. लोकायुक्त आणि आयकर विभागाच्या संयुक्ताने दोन दिवसांपासून ही छापेमारी सुरू होती. यापूर्वी देखील आयकर विभागाने भोपाळ आणि इंदौरच्या एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणांवर छापेमारी केली होती, त्यामध्ये मोठी रक्कम ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, मंडोरी जंगलातील कारवाईत देखील कंस्ट्रक्शन कंपनीचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, टॅक्स चोरी आणि बेकायदेशीर घटनांच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी संबंधित मालमत्ता, दस्तावेज व साक्षीदारांच्या चौकशीनंतर अनेक खुलासे होतील. तर, एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं आणि रोकड कुठे पोहोचवण्यात येणार होती, याचाही तपास विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta