
नवी दिल्ली : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी आता हिंदू धर्माचे सदस्य नाहीत. त्यांना हिंदू धर्मातून सार्वजनिकरित्या बहिष्कृत करण्यात येत आहे, अशी घोषणा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली. शंकराचार्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बद्रीनाथ येथील शंकराचार्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं की, राहुल गांधी यांनी मनुस्मृतीबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या आहेत. राहुल गांधींनी संसदेत म्हटलं की, अत्याचार करणाऱ्याला वाचवण्याचा फॉर्म्युला संविधानात नसून तुमच्या मनुस्मृतीत आहे’.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी तीन महिन्यापूर्वी राहुल गांधी यांना एक नोटीस पाठवली. यावर भाष्य करताना शंकराचार्य म्हणाले की, ‘अत्याचार करणाऱ्याला शिक्षा दिली जात नाही, मनुस्मृतीत कुठे लिहिले आहे? असा सवाल नोटीसमधून राहुल गांधींना केला. यावर राहुल गांधी यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्याचबरोबर त्यांनी माफी मागितलेली नाही’.
शंकराचार्य पुढे म्हणाले, ‘एक व्यक्त सातत्याने हिंदू धर्मग्रंथाचा अपमान करत आहे. त्यावर कोणतेही स्पष्टीकरण देत नाही. त्यांना हिंदू धर्मात कोणतेही स्थान दिले जाऊ शकत नाही. राहुल गांधी यांना मंदिरात विरोध झाला आहे. माझं पुजाऱ्यांना आवाहन आहे की, ‘त्यांना कोणतीही पूजा करू देऊ नये. त्यांना हिंदू सांगण्यचाही कोणताही आधार राहिलेला नाही’.
शंकराचार्य यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta