
कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. कानपूरच्या चमनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ५ मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ५० पेक्षा जास्त गाड्यांच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या चमनगंज परिसरातील गांधीनगरमध्ये असणाऱ्या पाच मजली इमारतीला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीला आगीने वेढा घातला. या इमारतीमध्ये अनेक जण अडकले होते. त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. आई-वडील आणि ३ मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ८ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या आगीमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आग विझवण्यासाठी ८ तास लागले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. या इमारतीच्या तळमजल्यावर चप्पल बनवण्याचा कारखाना होता आणि वरच्या मजल्यावर अनेक कुटुंब राहत होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण इमारत जळून खाक झाली. आग लागलेल्या इमारतीच्या दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरापर्यंत सर्व रस्ते ब्लॉक करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta