Saturday , October 19 2024
Breaking News

रोजगार निर्मितीत देशात बेंगळुरू अव्वल!

Spread the love

बेंगळुरू : देशातील इतर शहरांच्या तुलनेत बंगळूर हे सर्वाधिक रोजगार निर्मितीत आघाडीवर आहे. इथल्या रोजगार निर्मितीचे प्रमाण १७.६ टक्के एवढे आहे, अशी माहिती हायरेक्ट या चॅट-आधारित डायरेक्ट हायरिंग प्लॅटफॉर्मने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. दिल्ली रोजगार निर्मितीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथील रोजगार निर्मितीचे प्रमाण ११.५ टक्के आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईत रोजगार निर्मितीचे प्रमाण १०.४ टक्के आणि नोएडा येथे ६ टक्के आहे.
चॅट-आधारित डायरेक्ट हायरिंग प्लॅटफॉर्म हायरेक्टने याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात भविष्यातील भारतातील जॉब मार्केटचा अंदाज कसा घेतला जाईल यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती

विक्री आणि व्यवसाय विकास क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण २६.९ टक्के आहे. आयटी/आयटीईएस दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मिती करणारे मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्राने वर्षभरात २०.६ टक्के रोजगार निर्मिती केली आहे. तर खरेदी आणि व्यापार हे सर्वात कमी रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र होते. या क्षेत्रात केवळ ०.३ टक्के रोजगार निर्मिती झाली आहे.

आयटी क्षेत्रात मोठी संधी

IT/ITES उद्योगात नोकऱ्यांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेले आहे. कोरोना महामारीनंतर डिजिटायजेशनवर भर दिला जात आहे. यामुळे तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळाले आहे. परिणामी आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकर्‍या १६३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्यांचा IT उद्योगातील सरासरी पगार हा विक्री आणि व्यवसाय विकास क्षेत्रातील पगारापेक्षा ६२.३ टक्के अधिक आहे. आयटी फंक्शनल अंतर्गत बॅकएंड टेक्नॉलॉजी एकूण IT अभियंत्यांपैकी ४२.८ टक्के सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांसह आघाडीवर आहे. वेब-टेक्नॉलॉजीची sub-category १६.२ टक्क्यांसह रोजगार निर्मितीत दुसऱ्या स्थानावर आहे.

नोकर भरतीच्या ट्रेंडमधील जलद बदलांमुळे नोकर भरतीचे निर्णय फक्त नियोक्ते आणि एचआर यांच्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. संस्थापक, CXOs आणि Directors हेदेखील नोकर भरती प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होत आहेत. शिवाय, स्टार्टअप क्षेत्राला आर्थिक चालना देण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे बंगळूर, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे जागतिक स्तरावर मुख्यालये बनली आहेत. यामुळे टॉप कंपन्या याच शहरांतून नोकरी भरती करण्यावर अधिक भर देत असल्याचे अभ्यास अहवालात म्हटले आहे.

व्हाईट कॉलर नोकऱ्यांमध्ये वाढ

एप्रिल २०२१ मध्ये आलेल्या महामारीमुळे नोकर भरती प्रक्रिया विस्कळीत झाली होती. आता व्हाइट कॉलर जॉब्समधील भरती प्रक्रियादेखील अधिकृतपणे पुन्हा सुरू झाली आहे. एप्रिलमध्ये त्यात घसरण झाली होती. त्यानंतर भारतातील नोकर भरतीचा ट्रेंड जूनमध्ये उच्च पातळीवर पोहोचला.

इतर क्षेत्रांमध्ये नोकर भरती

हायरेक्टच्या डेटानुसार, मे पासून जूनमध्ये हॉटेल्स/रेस्टॉरंट्स एअरलाइन्स/ ट्रॅव्हल्स आणि रिटेल क्षेत्रात नोकर भरतीत लक्षणीय वाढ झाली आहे. विमा, बँकिंग/वित्तीय सेवा, फार्मा/बायोटेक, FMCG, शिक्षण/प्रशिक्षण आणि BPO/ITES यासारख्या क्षेत्रांतील नोकर भरतीत वाढ झाली आहे.

या अहवालावर बोलताना, हायरेक्ट इंडियाचे ग्लोबल सह-संस्थापक आणि सीईओ राज दास यांनी म्हटले आहे की, “गेल्या दोन वर्षांत अर्थव्यवस्थेत तीव्र मंदी आली होती. पण आता भारतातील नोकर भरती क्षेत्राने उभारी घेतली आहे. स्टार्टअप्समुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे.”

About Belgaum Varta

Check Also

गोमंतकीय कवी नवनाथ मुळवी आणि मानसी जामसंडेकर यांना ‘अभिजात मराठी भाषा काव्यगौरव पुरस्कार’

Spread the love  मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने “माय मराठी: अभिजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *