देवघर : कावड यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसला मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जमुनिया फॉरेस्ट परिसरात हा अपघात झाला. ही बस गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर धडकली. त्यानंतर हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १९ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कावड यात्रेकरूंनी भरलेली ही बस बाबा बैद्यनाथ धाममध्ये जलाभिषेक केल्यानंतर दुमका येथील बासुकीनाथ मंदिराकडे जलाभिषेक करण्यासाठी जात होती. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ही बस मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जमुनिया परिसरात आली. त्यावेळी अचानक एलपीजी सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या अपघातात सुरुवातीला ५ कावड यात्रेकरूंचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी मृतांचा आकडा वाढल्याचे सांगत १९ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच अन्य अनेक जण गंभीर जखमी असल्याचेही बोललं जात आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली. यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची पथके घटनास्थळी रवाना झाली. या अपघातातील जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातातील सर्व प्रवासी बिहारमधील बेतिया आणि गयाजी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta