भुवनेश्वर : ओडीशाच्या गंजाम गावामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला, तर चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात बसचा ब्रेक निकामी झाल्याने किंवा बसचा चालक नवीन असल्याने झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत जखमी प्रवाशांना जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. बसमधील सर्व प्रवासी पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात असून हे सर्वजण ओडीशाच्या दरींगबाडीवरून परत येत होते.
दरम्यान, या अपघातामध्ये हावडा जिल्ह्यातील सुल्तानपुर येथील सुपीया डेनरे (33), संजीत पात्रा(33), रीमा डेनरे (22), मौसमी डेनरे, बरनाली मन्ना (34) आणि हुगळीच्या गोपाळपुरमधील स्वपन गुशैत (44) अशी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत. हे सर्व प्रवासी ओडिसातील दरिंगबाडी येथे पर्यटनासाठी आले होते. याठिकाणी पूर्ण दिवस फिरल्यानंतर हे सर्वजण रात्री 11:30 च्या सुमारास विशाखापट्टणमला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी गंजाम येथे बसला भीषण अपघात झाला.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
दरम्यान, ओडिसातील अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तेते म्हणाले की, ओडीसाच्या गंजम जिल्ह्यातील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल अतीव दुःख झाले आहे. या दुःखदप्रसंगी माझ्या भावना शोकाकूल कुटुंबांसमवेत असून, या घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत, अशा संवेदना मोदींनी व्यक्त केल्या आहेत. तर, दुसरीकडे या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील दुःख व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, ओडीसातील बस दुर्घटनेची माहिती ऐकून खूप दुःख झाल्याचे म्हटले असून, बंगाल प्रशासन ओडीसामधील अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे म्हटले आहे.