नवी दिल्ली : एनडीएकडून राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी आपला संयुक्त उमेदवार जाहीर केला आहे. टीएमसीचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनाविरोधकांनी उमेदवार म्हणून उभे केले आहे. तर भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे २० नावांवर चर्चा झाली आणि आदिवासी महिला नेत्या मुर्मू यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीनंतर झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असल्याची घोषणा जे पी नड्डा यांनी केली. मंगळवारी (ता. २१) पक्षाच्या मुख्यालयात भाजपची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था असलेल्या संसदीय मंडळाची बैठक झाली.
Belgaum Varta Belgaum Varta