नवी दिल्ली : राज्यात निर्माण झालेल्या अभूतपुर्व राजकीय संकटादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. भेटी दरम्यान राज्यात सरकार स्थापनेसंबंधीच्या शक्यतेसंबंधी उभय नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये जवळपास तासभर चाललेल्या बैठकी दरम्यान सर्व राजकीय बाजूने चर्चा करण्यात आल्याचे समजत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाला बळ मिळाले आहे. कायदेशीर बाजू तपासल्यानंतर आता भाजप ऍक्शन मोडमध्ये आले आहे. याच अनुषंगाने फडणवीस दिल्लीत पोहचले आहेत. शिंदे गटासोबत सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर या गटाला किती मंत्रीपदे द्यायची, यासंबंधी देखील फडणवीस यांनी नड्डा यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
सोमवारी पार पडली होती कोअर कमिटीची बैठक
यापूर्वी सोमवारी भाजपच्या राज्यातील कोअर कमिटीची बैठक फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली होती. या बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेची, नेत्यांच्या मतांची माहिती देखील फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेतील जवळपास ४० हून अधिक बंडखोर आमदार गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये थांबले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस हे संभावित मंत्र्यांची यादी घेवून दिल्लीत पोहचले आहेत. पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर याला अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे बोलले जातील.
केंद्रीय गृहमंत्र्यांची देखील फडणवीस भेट घेणार
केंद्रीय गृहमंत्र्यांची देखील फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वात बनणाऱ्या संभावित नवीन मंत्रिमंडळात भाजपचे २९ मंत्री असतील. तर एकनाथ शिंदे यांच्या गटातील १३ आमदारांना कॅबिनेट मंत्री पद तसेच ५ आमदारांना राज्यमंत्री पर देण्याची तयारी असल्याचे प्राथमिक माहिती आहे.