नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याकडे महाविकास आघाडी सरकारसह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
सुनील प्रभू यांनी दाखल केली याचिका
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत, ते अवैध आहेत. तसेच या बहुमत चाचणीसाठी केवळ एक दिवसाचा वेळ दिला आहे. हा वेळ अपुरा आहे. सर्व आमदारांना पोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रभू यांनी याचिकेत म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनामी वेळी सर्वोच्च न्यायालयाने १२ तारखेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. या काळात काही निर्णय झाला तर आम्हाला न्यायालयात येण्यास सांगितले आहे. त्यामुळे या याचिकेवर तत्काळ सुनावणी येऊन राज्यपालांच्या आदेश रद्द करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.