नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे.
पहिल्या तिरंग्याचे छायाचित्र शेअर
यावर्षी आपण ‘आझादी का अमृत’ उत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ चळवळीला बळ देऊया. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले आहे.
20 कोटी लोकांच्या घरात तिरंगा फडकणार भाजपचा दावा
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची योजना आखली आहे. या अंतर्गत सुमारे 20 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवला जाईल, असा दावा भाजपाने केला आहे. याबाबत ट्विटरवर माहिती देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या मोहिमेद्वारे देशभरातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या मनात विशेषत: तरुणांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत अधिक प्रज्वलित करण्याचे काम करेल.