नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात बेकायदेशीररित्या बार चालवत असल्याचा धक्कादायक आरोप शनिवारी कॉंग्रेसने केला. याप्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत इराणी यांची केंद्रीय मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, इराणी यांच्या मुलीच्या वकिलांनी कॉंग्रेसने केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे. त्यांचे वकील कीरत नागरा यांनी एक वक्तव्य जारी करीत इराणी यांची मुलगी ‘सिली सोल्स’ नावाच्या रेस्टोरंटच्या मालकीन नाहीत, संचालकही नाहीत. कुठल्याही प्राधिकरणाकडून कुठलेही ‘कारणे दाखवा नोटीस’ त्यांना बजावण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे सर्व आरोप निराधार : स्मृती इरानी
कॉंग्रेसने एक कागदपत्र जारी करीत आबकारी विभागाने स्मृती इरानी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस जारी केल्याचा दावा केला आहे.ज्या अधिकाऱ्याने हे नोटीस बजावले आहे त्यांची बदली केली जात असल्याचा दावा देखील कॉंग्रेसने केला आहे. दरम्यान, या प्रकरणावर स्मृती इरानी यांनी देखील स्पष्टोक्ती दिली आहे. आपली मुलगी १८ वर्षाची असून महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थीनी आहे. कुठल्याही बारची ती संचालक नाही, असा दावा त्यांनी केला. कॉंग्रेसकडून मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याचे देखील त्या म्हणाल्या.