Saturday , December 13 2025
Breaking News

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांना अटक

Spread the love

 

हैदराबाद : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. युट्यूबवर राजा यांनी केलेल्या वक्तव्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद शहरामध्ये सोमवारी रात्री अचनाक अनेक पोलीस स्थानकांच्या बाहेर मोठ्या संख्येने जमाव गोळा होण्यास सुरुवात झाली. यामुळे शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. राजा यांचा व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल झाल्यानंतर ही मागणी करण्यात आली. शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरच्या रस्त्यावर आंदोलकांनी रस्ता आडवून धरला. बशीरबागमध्ये हे आंदोलन झालं. त्यानंतर आंदोलकांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये (दक्षिण विभाग) बळजबरीने प्रवेश करुन आपला आक्षेप नोंदवला. या आंदोलनानंतर सकाळी भाजपा आमदाराला अटक करण्यात आली आहे. उपायुक्त पी. साई. चैतन्य यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राजा यांना ज्या व्हिडीओमुळे अटक झाली तो १० मिनिटं २७ सेकंदांच्या व्हिडीओचं टायटल ‘फारुकी के आँख का इतिहास सुनिये’ असं आहे. श्री राम चॅनेल तेलंगण नावाच्या युट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये गोशामहलचे आमदार राजा हे स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीसंदर्भात बोलताना दिसत आहेत. फारुकीच्या कॉमेडी शोवर राजा यांनी टीका करताना भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या संदर्भातून टीका केली. शर्मा यांचं थेट नाव न घेता त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा उल्लेख राजा यांनी केल्याचं व्हिडीओत दिसत आहेत. शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला होता.

सोमवारी रात्री दहा वाजताच्या आसपास हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला. त्यानंतर हा व्हायरल झाल्यावर रात्रीच या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारावर कारवाई करावी अशी मागणी करत अनेकजण रस्त्यावर उतरुन आंदोलन करु लागले. या प्रकरणामध्ये मंगळवारी दाबीरपुरा पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी आंदोलनं सुरुच होती. अखेर राजा यांना आज सकाळी धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.

सोमवारी रात्री ऑल इंडिया मजलीस – ई – इतेहादूल मुस्लमीनचे मलकपेठचे आमदार अहमद बालाला यांनी दाबरीपुरा पोलीस स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांचे समर्थकही सोबत होते. अहमद यांनी राजा यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली. याचप्रमाणे चारमीनार, भवानी नगर, मीर चौक, रीन बाजार पोलीस स्थानकाबाहेरही मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. राजा यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आंदोलक करत होते.

About Belgaum Varta

Check Also

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन

Spread the love  मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *