मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड करण्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला असल्याचं समजतं. खरंतर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत संमत झाला होता. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता, ज्याला बैठकीत उपस्थित सगळ्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नव्हता.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर
राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनेही खासदार राहुल गांधी यांना पक्ष अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. सोमवारी (19 सप्टेंबर) पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह इथे पार पडली. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. जो एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta