नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मशिदीला भेट देत मुस्लीम नेत्यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली.
या भेटीबाबत बोलताना उमर इलयासी यांचा मुलगा सुहैब इलयासी यांनी सांगितलं, या भेटीने देशभरात एक चांगला संदेश गेला आहे. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे चर्चा केली. आमच्या निमंत्रणानंतर ते भेटीसाठी आले.
मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील या मशिदीला भेट दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचे अनेक अर्थ काढत तर्क वितर्क लावले जात आहेत.
या भेटीवर सरसंघचालक देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी मुस्लीम बुद्धीजीवींना भेटत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत अनेक लोकांना भेटत आहेत. हा सातत्यापूर्ण ‘संवाद’ प्रक्रियेचा भाग आहे.
मोहन भागवत यांनी 22 ऑगस्ट रोजी पाच मुस्लीम बुद्धीजीवींची भेट घेतली होती. तसेच सध्या देशातील बिघडलेलं धार्मिक सौहार्द यावर काळजी व्यक्त केली होती. या भेटीतही देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिल्याचं सांगण्यात आलं होतं.