केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली : देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज धोरणात बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिली.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या संसर्गग्रस्तांना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून सात दिवसांनी डिस्जार्च केले जावू शकते. दरम्यान सातत्याने तीन दिवसांपर्यंत रूग्णांची प्रकृती सुधारली आणि त्याला ताप आला नाही तर डिस्चार्ज करतांना त्यांची कोरोना तपासणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये देखील सुधारणा दिसून येत असेल आणि त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळी ऑक्सिजन सपोर्टशिवाय लागोपाठ तीन दिवसांपर्यंत 93 टक्क्यांहून जास्त राहत असेल तर रूग्णाला डिस्चार्ज केले जावू शकते, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
देशातील लसीकरणाच्या स्थितीबद्दल बोलतांना ते म्हणाले की आतापर्यंत 152 कोटींहून अधिक डोस लावण्यात आले आहेत. यातील 86.62 कोटींना पहिला डोस, तर 64.19 कोटींचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहेत. 18.86 लाख लोकांना खबरदारी म्हणून बूस्टर डोस लावण्यात आला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोना संसर्गाच्या फैलावाचा वेग अधिक असल्याने चिंता वाढली आहे. देशात केवळ 1 रूग्णांचा ओमायक्रॉनने बळी घेतला असल्याचे अग्रवाल म्हणाले.
महाराष्ट्रात 22.39 टक्के संसर्गदर आहे. तर, बंगालमध्ये 32.18, दिल्ली 23.1, उत्तर प्रदेश 4.47 मध्ये संसर्गदर अधिक असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन बर्याच वेगाने पसरत आहे. दक्षिण आफ्रिका, ब्रिटेन, कॅनडा तसेच डेनमार्क मध्ये आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटनुसार ओमायक्रॉन मुळे रूग्णालयात भरती होण्याचा धोका डेल्टाच्या तुलनेत बरीच कमी आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.
149 देशांमध्ये 5.52 लाख ओमायक्रॉनबाधित
जगातील 149 देशांमध्ये आतापर्यंत 5.52 लाख ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यातील 115 रूग्णांचा मृत्यू झाला. जगभरात मोठ्या संख्येत कोरोना रूग्ण आढळत आहे. 159 देशांमध्ये रूग्णसंख्या वाढत आहे. यूरोपातील आठ देशांमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये दुप्पट वेगाने वाढ नोंदवण्यात आली. गेल्या आठवड्यात दररोत सरासरी 25 लाख 13 हजार 144 रूग्ण आढळत असल्याचे अग्रवाल म्हणाले.
