नवी दिल्ली : देशाला आज नवीन संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते.
पंतप्रधान मोदींकडून मजुरांचा सत्कार
नवीन संसदेत राजदंड बसवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही इमारत बांधणाऱ्या मजुरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मजुरांचा सत्कार केला.
नवीन इमारतीच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनात महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली. सकाळी सव्वासातच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळ्यात आधी संसद भवन संकुलात असलेल्या गांधी मूर्तीजवळ बांधलेल्या विशेष मंडपामध्ये सकाळी साडेसात वाजता पूजा आणि हवनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तामिळनाडूच्या पुरोहितांनी पंतप्रधान मोदींना राजदंड सुपूर्द केला, जो त्यांनी संसद भवनात स्थापित केला. लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या शेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे.