Monday , December 8 2025
Breaking News

कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात एफआयआर

Spread the love

 

नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर लैगिंक शोषणाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक पुरुष कुस्तीपटूही सहभागी झाले होते. रविवारी आंदोलक महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. यासोबतच आंदोलक कुस्तीपटूंवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुस्तीपटूंवर दंगल भडकावण्यासह इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात एफआयआर
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एफआयआर नोंदवण्यात आलेल्या कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह इतर कुस्तीपटूही सामील आहेत. रविवारी आंदोलक कुस्तीपटूनं जंतर-मंतरहून नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंना अडवलं. बॅरिकेट तोडून संसद भवनाकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेत त्यांच्यावर एफआयआर नोंदवला.

कुस्तीपटूंना ताब्यात घेत गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह अन्य आंदोलक आणि आयोजकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलक कुस्तीपटूंना हटवलं आहे.

दंगल भडकावण्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल
लैंगिक शोषणविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी रविवारी (28 मे रोजी) दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या इमारतीबाहेर महिला सन्मान महापंचायत भरवण्याची घोषणा केली होती. पोलिसांनी या महापंचायतसाठी परवानगी नाकारली. त्यानंतर महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंनी संसद भवनाकडे शांतता मार्गानं मोर्चा वळवला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यानंतर पोलीस आणि कुस्तींपटूंमध्ये वाद झाला आणि पोलिसांनी बॅरिकेट ओलांडणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.

या देशात हुकूमशाही सुरू आहे का : विनेश फोगाट
आंदोलक कुस्तीपटूंवर एफआयआर दाखल करण्यात आल्यावर कुस्तीपटूंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगाटने ट्विटवर पोस्ट करत लिहीलं आहे की, “आमच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण विरोधात एफआयआर नोंदवायला दिल्ली पोलिसांना 7 दिवस लागले आणि शांततेने आंदोलन करणाऱ्या आमच्यावर एफआयआर नोंदवायला 7 तासही लागले नाहीत. या देशात हुकूमशाही सुरू आहे का? सरकार खेळाडूंना कशी वागणूक देतंय हे संपूर्ण जग पाहतंय. नवा इतिहास लिहिला जात आहे.”

कुस्तीपटूंवर ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल
आंदोलक कुस्तीपटूंवर दंगलीसह अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये कलम 147 (दंगल), कलम 149 (बेकायदेशीर सभा), 186 (लोकसेवकाला कर्तव्यात अडथळा आणणे), 188 (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा करणे), 332 (आंदोलकांनी) 353 (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी शक्ती) आणि लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी शक्ती यासह, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जंतरमंतर येथून आंदोलकांना हटवलं
कुस्तीपटूंवर कारवाई करण्यासोबतच पोलिसांनी जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरून आंदोलकांचं सर्व सामान हटवलं आहे. संसद भवनाकडे मोर्चा वळवलेले आंदोलक रात्री उशिरा पुन्हा जंतर मंतरवर आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे खेळाडू आता जंतर मंतरवर पुन्हा ठिय्या मांडू शकत नाही.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *