नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या विपरीत निकालांचा परिणााम होऊ नये म्हणून या वर्षअखेरीस होणार्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणुका घेण्याचा भाजप विचार करत आहे. तसे झाल्यास 2024 च्या एप्रिल महिन्याऐवजी चार महिने आधीच म्हणजे 2023 च्या अखेरीसच लोकसभेची निवडणूक होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभा निवडणुका घेतल्यास पक्षाची स्थिती कशी राहील, याचा आढावा घेण्यास सांगितले आहे.
मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या संपर्कात असलेल्या भाजप नेत्यांच्या मते जोपर्यंत पंतप्रधान मोदी यांना भाजपच्या विजयाची 100 टक्के खात्री पटणार नाही, तोपर्यंत एप्रिल 2024 च्या आधी ते लोकसभा निवडणुका घेणार नाहीत.
असे असले तरी या तीन राज्यांत स्वतंत्र विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी वेगळा निकाल आल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीवर विपरीत परिणाम होऊ नये व मोदी यांच्या करिश्म्यावर निवडणूक लढवल्यासही तिन्ही राज्ये जिंकता येतील, म्हणून लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुकांसोबतच घ्याव्यात, असा भाजपमध्ये एक मतप्रवाह आहे.
वसुंधराराजे पुन्हा मैदानात
कर्नाटकसारखी स्थिती येऊ नये म्हणून भाजपने सध्या दूर असलेल्या राजस्थानातील प्रभावी नेत्यांना जवळ करणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजस्थानात वसुंधराराजे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत पाचारण केले असून बुधवारी पक्षाचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासोबत त्यांनी तीन तास चर्चा केली. त्यात त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. यानंतर गुरुवारीही त्यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली.