दक्षिण ग्रीसच्या समुद्र तटावर शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारी नौका बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १०४ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांचा ड्रोनने शोध घेतला जात आहे. काल बुधवारी सकाळी ही घटना घडली.
दुर्घटनेतून वाचवण्यात आलेल्या लोकांना कलामाता शहरात नेण्यात आले आहे. वाचवण्यात आलेल्या सर्व लोकांचे वय १६ ते ४१ वयोगटातील आहे. बुडालेल्या नौकेत महिला आणि लहान मुलांचा देखील होते, अशी माहिती कलामाताच्या मेअरने दिली आहे.
ग्रीसच्या तटरक्षक दलाने सांगितले की अंधार पडल्यामुळे रात्री बचाव अभियान थांबवण्यात आले. आज गुरुवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, दुर्घटनेच्या वेळी नौकेत किती लोक स्वार होते याचा अधिकृत आकडा नाही. मात्र, बचावलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या नौकेत ७५० यात्री प्रवास करत होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौका लीबियाच्या टोब्रुक येथून रवाना झाली होती. दरम्यान संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी नौका बुडण्याची दुर्घटना भयावह असल्याचे म्हटले आहे.
नौकेतील सर्व प्रवासी ‘मायग्रेंट’
माध्यमांच्या माहितीनुसार, नौकेत स्वार अधिकतर प्रवासी हे पाकिस्तान, सीरिया आणि लीबिया येथील मायग्रेंट अर्थात स्थलांतरण करणारे होते. अशा प्रकारे पश्चिमी देशात जाण्यासाठी अनेक वेळा लोक नौकांमध्ये स्वार होतात. अनेकदा अशा प्रकारच्या नौकांमध्ये गरजेपेक्षा अधिक लोक स्वार झाल्याने नौका बुडल्याच्या घटना घडतात. यावेळीही देखील नौका उलटण्यासाठी गरजेपेक्षा जास्त प्रवासी नौकेत स्वार असल्याचे कारण दिले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta