Tuesday , December 9 2025
Breaking News

अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी!

Spread the love

 

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन व्हिप निघाले आहे. दोन्ही व्हीपची प्रत एबीपी माझाकडे आहे. एकीकडे अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन व्हिप निघाले आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. त्यापैकी चार खासदार महाराष्ट्रातले असून एक खासदार लक्षद्विपचे आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल हे खासदार शरद पवार गटाचे आहेत. तर सुनिल तटकरे अजित पवार गटाचे आहेत. सुनिल तटकरे यांनी काढलेल्या व्हिपमध्ये सर्वांनी मोदी सरकारच्या बाजूने आणि अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे मोहम्मद फजल यांनी व्हिप जारी करुन अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा अध्यक्ष कोणत्या व्हिपला अधिकृत व्हिप म्हणून मान्यता देतात, यावर पुढील कारवाईचं भवितव्य अवलंबून असतं. व्हिपचं उल्लंघन हा पक्षांतर बंदीच्या कायद्यातील गंभीर गुन्हा समजला जातो, ज्याद्वारे अपात्रतेची टांगती तलवार असते. यातून पळवाट म्हणजे मतदान टाळायचं असल्यास गैरहजेरी किंवा सभात्याग असे पर्याय सुद्धा वापरले जातात. त्यापैकी पर्यायांचा वापर होणार की सभागृहात प्रत्यक्ष हजर राहून अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करणार हे पाहावं लागेल.

पंतप्रधान मोदी आज अविश्वास ठरावावर उत्तर देणार
लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत 8 ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर बुधवारी (9 ऑगस्ट) राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. 2018 मध्येही मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *