नवी दिल्ली : लोकसभेत घुसखोरी करण्यासाठी प्लॅन ‘ए’ आणि प्लॅन ‘बी’ अशा दोन योजना आरोपींनी तयार केल्या होत्या. जर नियोजन केल्याप्रमाणे पहिली योजना यशस्वी ठरली नाही, तर पर्यायी योजना राबविण्याची तयारी ठेवण्यात आली होती. घुसखोरी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ललित झा याने पोलिसांना सांगितले की, जर ठरल्याप्रमाणे नीलम आणि अमोल संसदेच्या जवळ पोहचू शकले नाहीत. तर महेश आणि कैलाश यांना दुसऱ्या बाजूने संसदेच्या आवारात पाठविण्याची तयारी आम्ही केली होती. तिथून ते स्मोक कँडल फोडून माध्यमकर्मीसमोर घोषणाबाजी करणार होते, असा प्लॅन बी ठरला होता.
ललितने पुढे सांगितले की, पण महेश आणि कैलाश हे गुरुग्राममधील विकीच्या घरी पोहचू शकले नाहीत, त्यामळे आम्ही प्लॅन ए प्रमाणे अमोल आणि नीलमला मोहीमेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत त्या दोघांनी आपले ठरलेले काम पूर्ण करावे, असे निर्देश त्या दोघांना दिले होते. गुरुग्राममधील विकीच्या घरी हे सर्व लोक आदल्या दिवशी भेटले असल्याचीही माहिती ललितने दिली.
ललित झाने केले आत्मसमर्पण
१३ डिसेंबर रोजी संसदेत घुसखोरी झाल्यानंतर दोन दिवसांपासून दिल्ली पोलिस सहाव्या आरोपीचा शोध घेत होते. ललित झा याने बुधवारी (१४ डिसेंबर) रात्री दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर तरूणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ललित झा फरार झाला होता. दिल्ली पोलिसांनी ‘एएनआय’ला दिलेल्या माहितीनुसार, “संसदेत घुसखोरी करून सुरक्षेचा भंग केल्याच्या प्रकरणातील आरोप ललित मोहन झा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याची चौकशी करण्यात येत आहे.”
“नळकांड्या फोडल्याचा व्हिडीओ बनवून ललित झानं घटनास्थळावरून पलायल केलं. त्यानंतर ललितने बसच्या माध्यमातून राजस्थामधील नागौर शहर गाठले. तिथे त्यानं दोन मित्रांची भेट घेतली आणि एका हॉटेलमध्ये वास्तव्य केलं. त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ललित दिल्लीला आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली,” असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta