मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.
मध्य प्रदेशात गुना-अरोन मार्गावर ही घटना घडली आहे. गुनाचे पोलीस अधीक्षक विजय कुमार खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुना येथे बस आणि ट्रकची धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की, बस पलटी झाली आणि आग लागली. या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, १४ जणांना गुना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं.”
गुनाचे जिल्हाधिकारी तरूण राठी म्हणाले, “ट्रक आणि बसची धडक झाली आहे. यानंतर बस पलटी होऊन आग लागली. यात १४ लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि बसची धडक कशामुळे झाली? याची माहिती चौकशीनंतर समोर येईल.” “रूग्णालयात दाखल करण्यात आलेले सर्वजण सुखरूप आहेत. दुर्घटना शहरापासून लांब घडल्यानं अग्निशमन दलास येण्यास विलंब लागला,” असं स्पष्टीकरण तरूण राठी यांनी दिलं.