
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधून झालं आहे. त्या ठिकाणी आता रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पूजा केली जाणार आहे. देशभरात या मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह आहे. तसंच राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरात विविध पद्धतीने तयारीही सुरु आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक दावा केला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या जागी आधी गौतम बुद्ध मंदिर होतं असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
“अयोध्येत जिथे राम मंदिर आहे तिथे बुद्ध मंदिर होतं. उत्खनन केलं तर ही बाब समोर येईल. मात्र बाबरी मशिद आणि राम मंदिर यांच्या वादात तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. बाबरी मशिदीला पाच एकर जागा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तर आता रामाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. या वादात आपण पडून समाजात फूट पाडणं योग्य नाही म्हणून आम्ही त्यात पडलो नाही. पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत. उत्खननात बुद्ध मंदिराचे अवशेष सापडले आहेत. अडीच हजार वर्षे या गोष्टीला झाली. त्यानंतर राम मंदिर त्या ठिकाणी आलं.” असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुस्लिम समाजाने शांतता कायम ठेवली. बंधुभाव कायम रहावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
अडीच हजार वर्षांपूर्वी सर्वात आधी अयोध्येत भगवान गौतम बुद्धांचं मंदिर होतं. त्यानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर आलं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं असून आता अयोध्येत गौतम बुद्धांचं मंदिर व्हावं यासाठी आपण प्रयत्न करु असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta