नवी दिल्ली : एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं. आता अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच आयोगामध्ये शिल्लक राहिले आहेत. विशेष म्हणजे अरुण गोयल यांनी कार्यकाल संपण्याच्या तीन वर्षे आधीच राजीनामा दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे.
अरुण गोयल यांची 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी भारत सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर लोकसभा निवडणुकीचा भार पडणार आहे.