इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरने अजरबैजानमधून परतत होते. त्याचवेळी त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. १७ तास उलटल्यानंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडलं आहे. हेलिकॉप्टर जळून खाक झालं आहे. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. या अपघातात रईसी यांच्यासह कुणीही वाचलेलंं नाही.. रेड क्रिसेंटने याबाबतची माहिती दिलेली नाही. एक ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये हेलिकॉप्टर प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं आहे. आता अध्यक्ष रईसी यांच्यासह इतरांचा शोध घेतला जात होता. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
इराणतर्फे काय सांगण्यात आलं आहे?
इराणच्या प्रेस टीव्हीने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली आहे. त्यांना त्या ठिकाणी कुणीही जिवंत असल्याचं आढळून आलेलं नाही. अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर्स होती. ज्यातली दोन सुखरुप परतली. मात्र इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियन ज्यामध्ये होते ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि मोठा अपघात झाला. १६ तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. आता या पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले आहेत. या घटनेत इब्राहीम रईसींसह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे.
कधी घडली घटना?
इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला. यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र इब्राहिम रईसी यांच्याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र धुकं आणि खराब हवामान यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर इराणची चिंता वाढली आहे. राष्ट्रपती रईसी हे सुखरुप परत येतील असा विश्वास आम्हाला वाटतो आहे असं तिथले एक बडे नेते अयातुल्ला खैमी यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांची ही आशा आता मावळली आहे कारण इब्राहीम रईसी यांचा मृत्यू झाला आहे.