लंडन -भारताविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी येथे दाखल झालेल्या न्यूझीलंड संघाला विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे सरावाला परवानगी दिली आहे.
येत्या 18 जूनपासून हा सामना सुरू होत असून, या लढतीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते भारताविरुद्ध 18 ते 22 जून या कालावधीत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहेत.
न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. कर्णधार केन विल्यमसनसह सर्व खेळाडूंना परवानगी मिळाल्यानंतर सराव सुरू केला आहे. यात काएल जेमीसन, मिचेल सेंटनर, संघाचे फिजिओ टॉमी सिमसेक, प्रशिक्षक ख्रिस डोनाल्डसन यांचा समावेश आहे.
भारताचे गोलंदाजही चतुर
भारतीय गोलंदाजी गेल्या चार पाच मोसमांपासून सातत्याने वर्चस्व गाजवत आहे. एकेकाळी केवळ फिरकीला महत्त्व देत असलेला भारतीय संघ आज वेगवान गोलंदाजीनेही जागतिक क्रिकेटवर मक्तेदारी निर्माण करत आहे.
सध्याच्या भारतीय संघात जे वेगवान गोलंदाज आहेत ते फलंदाजांचे कमकुवत दुवे शोधून काढतात व त्याच्यावर दडपण राखतात, त्यामुळे त्यांच्या वेगवान गोलंदाजीचेही आमच्यासमोर आव्हान राहील, असेही मत त्यांनी मांडले.
भारताकडे गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत. जसप्रीत बुमराहपासून ते शार्दुल ठाकूरच्या आव्हानांचा सामना आम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर महंमद सिराज आणि फिरकी गोलंदाजदेखील आहेत, असेही ते म्हणाले.
पंतकडून जास्त धोका
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतपासून सावध राहावे लागेल. त्याच्याकडूनच आम्हाला जास्त धोका आहे, असे मत न्यूझीलंडचे गोलंदाजीचे प्रशिक्षक शेन जुरगेंसेन यांनी व्यक्त केले आहे.
पंत धोकादायक खेळाडू आहे. तो एकटा सामना फिरवू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध त्याने कशा पद्धतीने कामगिरी केली होती. पंत हा खूप सकारात्मक विचार करणारा खेळाडू आहे. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती.
भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. पंतने या वर्षी खेळलेल्या 6 कसोटी सामन्यात 515 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्यापासून सावध राहावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.