महिनाभरात घरकुलांना मंजुरी ; तालुका पंचायत अधिकाऱ्यांची भेट
निपाणी(वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्या काळात २०१९-२० आणि २०२१-२२ सालात कुन्नूर येथील अनेक घरांची पडझड झाली होती. त्याचा सर्वे झाल्यानंतर नुकसानग्रस्त घरासाठी लाभार्थी पात्र ठरले आहेत. पण त्यातील हाताच्या बोटांवर असलेल्या नागरिकांनाच घरी मंजूर झाले आहेत. त्यामुळे उर्वरित लाभार्थींना घरे मंजूर न केल्याने लाभार्थीनी मंगळवारी (ता.१७) कुन्नूर ग्रामपंचायत समोर उपोषण केले. तालुका पंचायत अधिकारी रवीकुमार हुक्केरी यांनी सायंकाळी भेट देऊन भेट महिनाभरात महिना लाभार्थींना घरकुल देण्याची लेखी ग्वाही दिली. त्यामुळे लाभार्थींनी उपोषण मागे घेतले.
कुन्नूर येथे दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होत आहे. मात्र नागरिकांच्या समस्याकडे जिल्हा व तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. २०२१-२२ मध्ये अतिवृष्टीमुळे या गावात सुमारे २८९ घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या आदेशावरून गावात तहसीलदार, ग्रामपंचायत विकास अधिकारी गाव लेखापाल व जिल्हा पंचायत अभियंत्यांच्या उपस्थितीत संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले.
पडझड झालेल्या घरांचे ग्रामपंचायतीने जीपीएस केले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या कुटुंबांना शासनाचे अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे कंटाळून लाभार्थींनी उपोषण सुरू केले होते. सकाळी दहा वाजता पंकज पाटील व सुजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उपोषणास प्रारंभ झाला. यावेळी पंकज पाटील, सुमित्रा उगळे, दादासो जाधव यांनी, लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीसाठी वेळ दिल्यास योग्य लाभार्थ्यांना घरी देणे शक्य असून लाभार्थीने उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. पण लाभार्थी उपोषणावर ठाम असल्याने तहसीलदार निघून गेले.
तालुका पंचायत अधिकारी रवीकुमार हुक्केरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले. मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार आणि सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी भारत पाटील, सुभाषराव जाधव, ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शिवाजी निकम, दादा जाधव, फिरोज सनदी, बी. एन. इंगळे, रवींद्र मगदूम, आर. वाय. पाटील, बाळासाहेब करडे, वरुण कुलकर्णी, जितेंद्र चेंडके, रामचंद्र चेंडके, जैनुल सनदी, सर्जेराव पाटील, धोंडीराम धनगर, प्रवीण नाईक, संतोष कोळी, विलास पाटील, अनिल जाधव, मानाजी चेंडके, विजय हेगडे, माणिक कांबळे यांच्यासह घरकुल लाभार्थी उपस्थित होते.