संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुरबेट्टी : कोरोना योध्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर, नर्स, विविध सामाजिक संघटना रात्रंदिवस अथक परिश्रम घेत आहेत. या कोरोना विरुद्धच्या लढ्यात महात्मा बसवेश्वर क्रेडीट सौहार्द संस्थेचा सहभाग असावा, या उद्देशाने संस्थेतर्फे सर्वसामान्य गरजू रुग्णांना अल्पदरात सिटीस्कॅन सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी 2.75 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याची कार्यवाही लवकरच होणार आहे. याशिवाय कोरोना योध्यांचा सन्मान व आर्थिक मदत यासारखे लोकोपयोगी उपक्रम राबविण्यास सुरूवात केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, अध्यक्ष सुरेश शेट्टी यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात मंगळवारी (ता.8) सायंकाळी आयोजित कोरोना योध्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप व विविध सामाजिक संस्थांना आर्थिक मदत वितरणप्रसंगी ते बोलत होते.
विविध क्षेत्रातील 250 कोरोना योध्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. शंकरगौडा पाटील यांच्यासह संचालकांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष सुरेश शेट्टी म्हणाले, सामाजिक उपक्रम राबवित असताना ना नफा ना तोटा हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्य राहणार आहे. यापूर्वी संस्थेने महापूर, कोरोना काळात अनेक घटकांना मदतीचा हात दिला आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना आजारावर नागरिकांना भरमसाठ खर्च करावा लागत आहे. त्यासाठी संस्थेमार्फत सिटीस्कॅन सेंटर, एम.आर.आय. सेंटर व लॅबोलेटरी सुरू करण्यासाठी लवकरच जागा निश्चित केली जाणार आहे. सध्याच्या काळात ऑक्सीजनची फार गरज असून ऑक्सीजन प्लाॉटसुद्धा उभारला जाणार आहे. प्रकाश शाह, वज्रकांत सदलगे, सागर मिरजे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोरोना काळात महावीर आरोग्य सेवा, राष्ट्रकर्म संघटना, एकता फौंडेशनचे सदस्य कोरोना रुग्णावर उपचार करण्यासह मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहेत. या संघटनांना संस्थेतर्फे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष शंकरगौडा पाटील, संचालक प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, बसवराज कोठीवाले, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, किशोर बाली, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, मुख्य व्यवस्थापक शशिकांत आदन्नानावर, नामदेव कांबळे, संजय कांबळे, गोपाळ कांबळे यांच्यासह कर्मचारी, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, महात्मा गांधी हॉस्पिटल व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.