वैचारिक विचारांचा होणार जागर : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे निपाणीत रविवारी (ता.६) सायंकाळी चार वाजता महा पुरुषांच्या विचारांचा जागर कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेशाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून आठ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याची सज्जता झाली असून कार्यक्रमात व्याख्यान, प्रवचन, कीर्तन त्या माध्यमातून हा जागर सोहळा होणार आहे.
मानव बंधुत्व वेदिकातर्फे गेल्या दहा वर्षापासून संपूर्ण राज्यभर प्रबोधन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील तीन वर्षापर्यंत प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम होत आहे त्याची सुरुवात निपाणी येथून केली जाणार आहे. अंधश्रद्धेत गुरफटलेल्या बहुजन समाजाला वैचारिक सिद्धांताद्वारे जागृत करण्यासाठी तसेच मानव कल्याणासाठी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर यासारख्या महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास म्हैसूर येथील ज्ञानप्रकाश स्वामीजी, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्या प्रा.सुषमा अंधारे, हेब्बाळ येथील बसवचेतन स्वामीव चैतन्य महाराज वाडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वाहनांची व जेवणाची व्यवस्था स्वतंत्रपणे केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धेत गुरफटलेल्या समाज बांधवांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होणार आहे त्या दृष्टीने प्रथमच निपाणी भागात हा कार्यक्रम होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मानव बंधुत्व वेदिकेने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta