युवा नेते उत्तम पाटील : १ लाखाचे पहिले बक्षीस
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर शनिवार (ता.१२) ते गुरुवार (ता.१७) पर्यंत अरिहंत ट्रॉफी आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील विजेत्या संघाला १ लाखाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. शनिवारी (ता.५) रात्री आयोजित बैठकीत ते बोलत होते.
युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या सहकाऱ्यांने आणि निपाणी फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष धनंजय मानवी यांच्या नेतृत्वाखाली अकॅडमीचे प्रशिक्षक सचिन फुटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी समर्थ मंडळ व्यायाम शाळेचे डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी मैदान स्पर्धेसाठी खुले करून दिले आहे.
निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळण्याचे उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत मुंबई कर्नाटक तेलंगणा व इतर राज्यातील २४ संघांचा सहभाग राहणार आहे.
प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था केली आहे. विजेत्या संघास १ लाख रुपये, उपविजेता संघास ७५ हजार रुपये, तर उपांत्य फेरीतील दोन संघांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय इतर वैयक्तिक बक्षीसेही दिले जाणार आहेत. स्पर्धेसाठी पृथ्वीराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी बेंगळुरू आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय पंचांना आमंत्रित केले आहे. दररोज चार संघ खेळविले जाणार आहेत. निपाणी व परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ४ संघांना आमंत्रित केले असून त्यापैकी दोन संघांची निवड केली आहे. तर दोन संघांना वेटिंगमध्ये ठेवले आहे. तरी पाण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या स्पर्धेचा लाभ निपाणी शहर व परिसरातील क्रीडा शौकिनांनी घेण्याचे आवाहन उत्तम पाटील यांनी केले.
बैठकीस नगरसेवक संजय सांगावकर, इम्रान मकानदार, गजानन कावडकर, सचिन फुटाणकर, ओंकार शिंदे, जॉन मधाळे, करण माने, प्रशांत आजरेकर, शिवकांत खानापुरे, राहुल निंबाळकर यांच्यासह निपाणी फुटबॉल ॲकाडमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.