
माजी मंत्री सतीश जारकीहोळी : निपाणीत मानव बंधुत्व वेदिकेच्या चळवळीला प्रारंभ
निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर कार्यक्रम निरंतरपणे सुरू आहे. आपण सर्वजण महापुरुषांचा इतिहास विसरत चाललो आहोत. आपल्या मेंदूला बेडीतून बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. देश वाचविण्यासाठी महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवण्याची गरज आहे, असे मत मानव बंधुत्व वेदिकाचे संस्थापक व माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले. मानव बंधुत्व वेदिकेच्या चळवळीला निपाणी येथून सुरुवात झाली. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जारकीहोळी म्हणाले, एकाच सभेमुळे परिवर्तन होणे अशक्य आहे. त्यासाठी निपाणीपासून चामराजनगरपर्यंत असे कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्याच्या काळात आपले हक्क हिरावले जात आहेत. त्यामुळे आपण, आपले कुटुंब व परिसर बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जुन्या व्यवस्थेसह अंधश्रद्धा आणि बुवाबाजीमधून सर्वांनी बाहेर पडून क्रांती घडवावी, असे आवाहन जारकीहोळी यांनी केले.
प्रारंभी प्रा. ए. बी. रामचंद्रनावर यांनी प्रस्ताविक केले. त्यानंतर भारतीय संविधान वाचन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बसवचेतन देवरु म्हणाले, प्रत्येक निवडणुकीमध्ये जाती-धर्म आणि महापुरुषांचा उल्लेख करून त्यांचा वापर केला जात आहे. मात्र सतीश जारकीहोळी यांनी वैचारिक विचार घेऊन देशाला वाचविण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येकाने महापुरुषांचे स्मरण ठेवून काम केले पाहिजे. भारतीय संविधानात बदलणाऱ्यांना आता नागरिकांनीच बदलण्याची वेळ आली आहे. दलित मुख्यमंत्री झाल्यास देश वाचणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
वैशाली डोळस यांनी, मानव बंधूत्व वेदिकेमुळे देशात क्रांती होईल. बुवाबाजी बाजूला सोडून विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे. देशात दररोज शेकडो महिलांचे शोषण होत आहे. अशा परिस्थितीत देश पुन्हा पारतंत्र्यांमध्ये जाईल. समाजाचे आर्थिक शोषण होत असून त्याला आता थांबविण्याची गरज आहे. अंबानी, आदानी यांना सरकार मोठे करत असून दलितांना बाजूला ठेवले जात असून ही व्यवस्था बदलली पाहिजे. महागाई वाढली असून मोठमोठे उद्योगधंदे गुजरात मध्ये वळवून कर्नाटकातील नागरिकांना भिकेला लावले जात आहे. सध्या वापरा आणि फेकून द्या, अशीच परिस्थिती सरकारने केली आहे. प्रधानमंत्री पद संविधानामुळे मिळाले असून ते प्रत्येकांनी लक्षात ठेवून संवीधखनाचे अस्तित्व टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले.
म्हैसूर येथील प्रकाश स्वामी यांनी, हिंदुत्व हाच मतांचा अजेंडा बनला आहे. पण सध्या त्यामध्ये बंधुत्व हवे आहे. हिंदुत्व देश नाश करत असून परिणामी देश अडचणीत आला आहे. त्यामुळे महापुरुषांच्या नावे मते मागणाऱ्यांना आपली मते विकू नका. जाती धर्मामध्ये ठिणगी पाडून सत्ताधारी लोक आपली पोळी भाजून घेत आहेत. मतदारामुळेच समाज व्यवस्था बदलू शकते. त्यामुळे महापुरुषांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन जीवनात वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, युवा नेते उत्तम पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा नेते रोहन साळवे, दलित क्रांतिसेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, माजी मला पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, युवा नेते राहुल जारकीहोळी, महावीर मोहिते, विजय शेटके, माजी जिल्हा पंचायत सदस्य सदस्य अण्णासाहेब हावले, सुप्रिया पाटील, शैलजा चडचाळे, साधना माळगे, नगरसेवक विलास गाडीवडर, बाळासाहेब देसाई-सरकार, संजय सांगावकर, युवराज पोळ, नवनाथ चव्हाण, अल्लाबक्ष बागवान, सुनील हणमणावर, दिग्विजय-पवार देसाई, सुजय पाटील, महादेव कौलापुरे, प्रतीक शहा, सुंदर पाटील, दिलीप पठाडे, बाबुराव खोत, अशोक लाखे,गजानन मंगसुळी यांच्यासह चिकोडी जिल्हा काँग्रेस व्याप्तीतील मतदारसंघातील आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta