कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार तारीख 8 रोजी संध्याकाळी आठ वाजता घडली.
सिद्धार्थ आनंदा कांबळे (वय 48) हालसिद्धनाथ नगर कोगनोळी असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळगाव दिंडेवाडी तालुका भुदरगड, सध्या राहणार हालसिद्धनाथ नगर कोगनोळी येथील सिद्धार्थ कांबळे कामावरून कोगनोळी फाट्यावरून घरी येत होते. याच दरम्यान अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली. ते गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर येथे नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच हालसिद्धनाथ नगर व कोगनोळी येथे हळहळ व्यक्त होत आहे.
रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सिद्धार्थ कांबळे हे अत्यंत गरीब व मनमिळाऊ स्वभावाचे होते. घरातील कर्त्या पुरुषाचे असे अपघाती निधन झाल्याने कांबळे कुटुंबावर आघात झाला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ भावजय असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta