निवडणूक अधिकारी प्रविण कारंडे : निपाणी, बेडकीहाळ येथे बीएलओंना प्रशिक्षण
निपाणी (वार्ता) : मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली असून ८ डिसेंबरपर्यंत सदर मतदार यादी संदर्भात कोणत्याही हरकती असल्यास नोंदवाव्यात. तसेच अजूनही वंचित असलेल्या व्यक्तींची मतदारयादीत नावे नोंदविण्यासाठी ८ डिसेंबरपूर्वी मुदत आहे. या वेळेत बीएलओ यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे जागृती करावी, अशा सूचना सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिल्या.
निपाणी तालुक्यात प्रशासनातर्फे मतदार जागृती मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेडकीहाळ व निपाणी येथे बीएलओ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कारंडे म्हणाले, निपाणी तालुक्यात १२ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, ३ डिसेंबर व ४ डिसेंबर या दिवशी विशेष मतदार जागृती अभियान राबविले जाणार आहे. हे अभियान चांगल्या पद्धतीने यशस्वी करावे, त्यानंतर ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
१ जानेवारीपूर्वी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचे नाव मतदार यादीत असावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदार यादीची दुरुस्ती, नावे कमी करणे, नावे नोंदविणे यासंदर्भात अर्ज क्रमांक ६, ७ व ८ भरून संबंधित बीएलओ यांच्याकडे देण्याचे आवाहनही यावेळी कारंडे यांनी केले. यावेळी उपतहसीलदार अभिषेक बोंगाळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी बीएलओ यांना मार्गदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta