धाबाचालक गजाआड : अबकारी खात्याची कारवाई
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी हद्दीतील आरटीओ कार्यालयाजवळ धाब्यातून विक्री होणारे सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 35 किलो अफीम जप्त करण्यात आले.
बेळगाव व चिकोडी विभागाच्या अबकारी विभागाने संशयित धाबाचालक गिरधरसिंह किशोरसिंह राजपुरोहित (वय 41) राहणार इस्पुरली सावंतवाडी याला अटक केली.
चिकोडी विभागाचे अबकारी पथक बुधवारी सायंकाळी महामार्गावर घस्त घालत असताना कोगनोळी आरटीओ ऑफिस नाक्यासमोर दोन ट्रक चालकांमध्ये वाद चालला होता. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशयावरून या ठिकाणी बराच वेळ थांबून चाचपणी केली. तसेच या पथकाने जवळच असलेल्या राजस्थानी राजपुरोहित धाब्यावर वेशांतर करून टेहाळणी केली. यावेळी महामार्गावरून ये जा करणाऱ्या ट्रक चालक व अन्य वाहन चालकांना अफीम खरेदी करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने धाबा चालक गिरधरसिंह राजपुरोहितला ताब्यात घेऊन चौकशी केली. धाब्यामध्ये अफीमची विक्री करत असल्याची कबुली त्यांनी दिली.
पथकाने गिरधरसिंह कडून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 34 किलो 465 ग्रॅम अफीम जप केले.
याबाबत अबकारी चिकोडी विभागाचे उपायुक्त जगदीश कुलकर्णी म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून गिरधरसिंह अफीम विक्री व्यवसाय करत असल्याचे बोलले जात होते. आपल्या खास ओळखीच्या व नियमित येणाऱ्या चालकांनाच विक्री करत असल्याने पकडणे कठीण झाले होते. पकडण्यात आलेल्या अफीमची किंमत सुमारे दहा लाख रुपये होते. गिरीधरसिंहवर अबकारी विभागाने अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून चिकोडी न्यायालयासमोर हजर केले. त्याची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली आहे.
या कारवाईमध्ये विभागाची जिल्हा अप्पर उपायुक्त डॉक्टर वाय मंजुनाथ, सहाय्यक अबकारी आयुक्त फिरोज खान, किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी अबकारी विभागाचे सहाय्यक उपायुक्त अनिलकुमार नंदेश्वर, उपाधीक्षक राजू गुंडे यांच्यासह उपनिरीक्षक शिवकुमार, अमीनभावी, शंकर चौगुले, हवालदार केदारी नलवडे, अर्जुन मल्लापुरे, दशरथ कुराडे, सागर बोरगावे यांनी सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta