माजी खासदार रमेश कत्ती : कोगनोळीत पिकेपीएस संस्थेचे उद्घाटन
कोगनोळी : आपल्याला राजकारणात येण्यासाठी कोगनोळी गावची फार मोठी मदत आहे. कोगनोळी येथील शेतकऱ्यांचे 1 कोटी 85 लाख रुपये कर्ज माफ झाले आहे. देशाला मजबूत स्थितीत आणणारा शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत कोणत्याही संस्थेचा एक रुपयाही बुडवलेला नाही. शेतकरी वर्गाची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी चांगला असला पाहिजे. आरोग्य, शिक्षण, शेतीसाठी पाणी, 24 तास विद्युत पुरवठा, चांगल्या दराने उत्पादनाची खरेदी या सर्व गोष्टीची सरकारची जबाबदारी आहे. सरकारने चार हजार कोटी कर्ज माफ केले. लगेच 13% वॅट लावले. यातून सरकारने एक लाख कोटी रुपये जमा केले. कर्जमाफी फुकट झाली नाही. कोण कुणाला काही देत नाही. शासनाचे पैसेही आपलेच आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत ही आपली आग्रही भूमिका असते. शेतकरी हा कुठल्या पक्षाचा जाती-धर्माचा नसतो असे मनोगत माजी खासदार व बीडीसीसी बँक चेअरमन रमेश कत्ती यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या इमारत उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील तर प्रमुख उपस्थित म्हणून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटी चिकोडी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे आदी उपस्थित होते.
प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले यांनी स्वागत तर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेने 46 वर्षे पूर्ण केली आहे. संस्थेने 72 लाख रुपये खर्च करून नवीन अशी सुसज्ज इमारत बांधली आहे. संस्थेच्या वतीने विविध सुविधा सभासदांना देण्यात येत आहेत.
यावेळी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, शेतकरी हा 24 तास देशासाठी काम करत असतो. सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी काम केले पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी, चांगले शिक्षण यास अन्य सोयीसुविधा सरकारने पुरवणे गरजेचे आहे. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, 1904 साली सहकार चळवळ सुरू झाली. यानंतर सहकार क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. पण आत्ता सहकार क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. कोगनोळी येथील संस्था चांगले काम करत आहे. सुसज अशा इमारतीचे काम कौतुकास्पद आहे.
लक्ष्मण चिंगळे म्हणाले, सहकार क्षेत्र मर्यादित नाही. शेतकऱ्यांनी कर्ज माफ होईपर्यंत वाट न पाहता आपले कर्ज वेळेत भरावे यामुळे संस्थेच्या भरभराटीस मदत होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात पक्ष नाही. सहकार क्षेत्रात पक्ष आला तर सहकार संपते. सतीश जारकीहोळी, रमेश कत्ती हे दोन नेते सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत.
यावेळी महावीर मोहिते, प्रदीप जाधव, बाबुराव खोत, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, सचिन खोत, पुनम डांगरे, अरुण निकाडे, संजय शिंत्रे, अण्णासाहेब हावले, बाबुराव मगदूम, तात्यासाहेब कागले, युवराज कोळी, बाळासाहेब पाटील, रामचंद्र कागले, केशव पाटील, रवींद्र पाटील, बिरसू कोळेकर, जहांगीर कमते, अशोक कुरणे, पुष्पावती पाटील, सुलोचना मगदूम, कृष्णात निकाडे, महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश कदम यांनी सूत्रसंचालन तर संचालक जगन्नाथ खोत यांनी आभार मानले.