अग्निशामक दलाच्या ७ वाहनाद्वारे आग आटोक्यात
निपाणी (वार्ता) : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेदहा वाजता सुमारास अचानक आग लागली. निपाणी, चिकोडी संकेश्वर, बिद्रीसह अग्निशामक दलाच्या सात वाहनाद्वारे तासाभरात ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये साखर कारखान्याचे १.५ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, साखर कारखान्याच्या बाजूलाच बगॅस साठा आहे. सकाळी साडेदहा वाजता सुमारास अचानक बगॅसला आग लागली. याची माहिती कारखान्याकडून मिळताच येथील अग्निशामक दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात न आल्याने चिकोडी, संकेश्वर, बिद्रीसह एकूण सात वाहनाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाला. सुमारे तासभर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तरीही बगॅसचे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी येथील अग्निशामक दलाचे उपनिरीक्षक ए. आय. रुद्रगौडा, अकबर मुल्ला, सिद्धाप्पा मगदूम, जगदीश कांबळे, रवींद्र हेगडे, प्रकाश कुंभार, विजय देवरुशी, विजय निर्मळे, नजीर आत्तार यांच्यासह चिकोडी, संकेश्वर, बिद्री येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आगीचे माहिती मिळताच कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक प्रकाश शिंदे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी यांच्यासह कारखान्याचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta