राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलिबॉल स्पर्धा : स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे
निपाणी (वार्ता): अर्जुन नगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार ता.२२ ते बुधवार ता.२४ अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तयारीची पाहणी शुक्रवारी (ता.२०) उत्तम पाटील यांनी केली. या स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे आले आहे.
स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे, सुवर्ण, रौप्य, तसेच कांस्यपदके आणि अरिहंत चषक दिला जाणार आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे ४० संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांचेही सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी कर्नाटक तसेच महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दिवस-रात्र प्रकाशझोतात खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भव्य प्रमाणात विद्युत व्यवस्था तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून पुढील महिन्यात गुवाहाटी येथे होणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रकाश झोतातील चार मैदानांची निर्मिती करण्यात आली आहेत. याशिवाय दोन अतिरिक्त मैदाने तयार ठेवण्यात आली आहेत.
तयारीच्या पाहणी प्रसंगी नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, गोपाळ नाईक, नगरसेवक शौकत मनेर, शेरू बडेघर, दत्ता नाईक, दीपक सावंत, संजय पावले, शिरीष कमते, इम्रान मकानदार, बालवीर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजकुमार सावंत, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. शिवाजी मोरे, सचिन पोवार, आकाश खवरे, विनायक उमराणे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, खेळाडू उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta