सौंदलगा : सौंदलगा येथील सरकारी उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेमध्ये अभ्यासासाठी दोन तास या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत टीव्ही पाहणार नाही व हातामध्ये मोबाईल घेणार नाही, अशी शपथ विद्यार्थिनींच्याकडून घेण्यात आली.
दररोज सायंकाळी टीव्ही पाहण्यामध्ये आणि मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना अभ्यासाकडे पुन्हा वळवण्यासाठी, मुलींच्या शाळेमध्ये अभ्यासासाठी दोन तास हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुलींना शपथ देण्याबरोबरच पालकांना सुद्धा मुलींना दोन तास अभ्यासासाठी बसवण्याची विनंती करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक शनिवारी प्रत्येक विषयातील तज्ञ शिक्षकांना बोलावून त्यांच्याकडून विद्यार्थिनींना त्या विषयाचे अधिक ज्ञान देण्याचा उपक्रमही सुरू केला आहे. यावर्षी शासनाकडून घेण्यात येणारी इयत्ता पाचवीची बोर्ड परीक्षा आणि त्याचबरोबर मार्चमध्ये होणारी वार्षिक परीक्षा यांचा विचार करून नियमितपणे अभ्यासाची विद्यार्थिनींना सवय व्हावी यासाठी हा उपक्रम एसडीएमसी आणि शिक्षक यांनी मिळून राबवण्याचे ठरविले आहे.
यावेळी बोलताना एसडीएमसी अध्यक्ष श्री. अजित कांबळे म्हणाले की, नियमितपणे अभ्यासामुळे मुलांची बौद्धिक क्षमता तर वाढेलच पण त्याचबरोबर टीव्ही आणि मोबाईल पासून दूर राहिल्यामुळे त्याचा आरोग्यासाठीही चांगला परिणाम होईल. यावेळी उपाध्यक्ष श्री. सागर चौगुले, सदस्य श्री. शिवाजी हातकर, श्री. दत्तात्रय कुंभार तसेच शाळेतील शिक्षक श्री. व्ही. आर. पाटील, श्री. एस. एन. बुरलट्टी, श्रीमती एस. आर. परीट, श्रीमती एस. डी. चौगुले, श्रीमती व्ही. एम. नेजकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे आभार श्री. संतोष पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta