माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत काँग्रेसचा युवा मेळावा
निपाणी (वार्ता) : काँग्रेस सत्तेमध्ये असताना निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाश्वत विकासाची कामे केली आहेत. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधा पुरवण्याच्या नावाखाली नागरिकासह तरुणांना बोलवण्याचे काम करीत आहेत, असा घनाघाती आरोप माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित युवा मेळाव्यात त्यांनी हा आरोप केला.
माजी आमदार पाटील म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी तरुणांना मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली. भाजपा हा व्यापाऱ्यांचा तर काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. अर्जुनी येथे अधिक वसाहत होऊन तरुणांना काम मिळावे, अशी मागणी आपण केली होती. पण या मतदारसंघातील सध्याच्या लोकप्रतिनिधी ही वसाहत या भागात येण्यापासून बंद केले आहे. आपण तंबाखू वरील व्हॅट रद्द करण्यासह, काळमवाडी प्रकल्प, ग्रामीण भागात पाझर तलाव अशी अनेक शाश्वत कामे केले आहेत. १४ हजार कोटी रुपयाची विकास कामे केल्याचे भास होत असले तरी प्रत्यक्षात मात्र कुठेच शाश्वत कामे दिसत नाहीत. दोन वेळा पराजय झाला असला तरी सर्वसामान्यांच्या कामासाठी आपण नेहमीच कार्यरत आहे. भाजपाच्या काळात महागाईचा आग डोंब झाला असताना यावर बोलायला कोणी तयार नाही. असे सांगून मंत्र्यांच्या अंडी घोटाळ्यावर ही सडकून टीका केली.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, भाजप ही सर्वधर्मासाठी अफूची गोळी बनली आहे. काँग्रेसने केलेली शासन विकास कामे युवकांनी घराघरापर्यंत पोहचवली पाहिजेत. आता सत्तेमध्ये बदल न झाल्यास कार्यकर्त्यांसह नागरिकांना रस्त्यावर लागेल. काँग्रेसतर्फे काकासाहेब पाटील यांनाच उमेदवारी असून नागरिकांच्या आपल्याला बळी न पडण्याचे आवाहन केले.
निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी, कार्यकर्त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवू नये. सर्वांनी एक संघ होऊन कामाला लागण्याचे आवाहन केले. पंकज पाटील यांनी, आज तागायत सत्ताधाऱ्यांनी एकही उद्योग व्यवसाय या भागात आणलेले नाही. स्वतःचेच उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना आता थांबविण्याची वेळ आली आल्याचे सांगितले. यावेळी लोकेश घस्ते, संजय कांबळे, दादासाहेब हळवणकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन झाले. काँग्रेस युवा अध्यक्ष प्रतीक शहा यांनी स्वागत केले.
मेळाव्यास माजी नगराध्यक्ष विजय शेटके, अन्वर हुक्केरी, निकु पाटील, सुजय पाटील, नवनाथ चव्हाण, अवधूत गुरव, अमोल बन्ने, अब्बास फरास, अरुण आवळेकर, प्रशांत नाईक, किरण कोकरे, रामा निकम, बबन चौगुले, रवींद्र श्रीखंडे, अशोक लाखे, इंद्रजित बगाडे, दीपक ढणाल, प्रदीप सातवेकर, अमृत ढोले, नितीन साळुंखे, सुधाकर सोनकर, मुकुंद रावण यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीनिवास संकपाळ यांनी सूत्रसंचालन तर अस्लम शिकलगार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta