नागरिकांची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन
निपाणी : भविष्यात होणार्या आणि शहरातून जाणार्या महामार्ग क्र. 4 च्या रुंदीकरणाबाबत शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी निवेदन देवून येथील रहिवाश्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांची कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील माहिती अशी, शिवाजी नगर भागातून जाणारा महामार्ग क्र. 4 ची निर्मिती करतेवेळी येथील रहिवाश्यांची घरे गेली आहेत.
आता पुन्हा त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यामध्ये या भागातील स्वामी मळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मार्गावर पूल आहे. त्या पूलाशेजारी लोकवस्ती आहे. नवीन सर्वेक्षणाप्रमाणे 200 ते 300 घरांचे यामुळे नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी धारवाड येथील महामार्ग प्राधीकरणाकडे पाठपुरावा करण्यात आला असून त्यांच्या माहितीप्रमाणे पूला शेजारी मोठा सेवा रस्ता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या लागून शहरासाठी वेगळा सेवा रस्ता होणार आहे.
सध्या सेवा रस्ता असतांना पुन्हा सेवा रस्ता करण्याची गरज नाही. सध्याचा महामार्ग 6 पदरी रस्ता आहे. तसाच ठेवल्याने शासनाच्या कामात कोणताच अडथळा येणार नाही. त्याला लागून गावासाठी असणारा आणखीन एक सेवा रस्ता कमी करण्यात यावा. या परिसरात फक्त 200 ते 300 मिटर अंतर इतके पूल आहे.
या परिसरात सेवा रस्ता कमी केल्यामुळे 200 ते 300 लोकांचे कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. त्याबाबत नगरपालिका प्रशासनाने नागरिकांची बाजू मांडून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर निवेदन स्विकारून नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी याप्रश्नी उच्चाधिकार्यांशी चर्चा करण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी उपनगराध्यक्षा निता बागडे, विजय टवळे, दत्ता जोत्रे, विनोद बागडे, गणू गोसावी, अविनाश माने, आंद्रेश सुतार उपस्थित होते.
