Share

हत्ती, घोडे, बँड पथकाचा समावेश : तब्बल १४ तास मिरवणूक
निपाणी (वार्ता) : येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. त्यानिमित्त भाविकांची दररोज दर्शनासाठी गर्दी होत आहे. रविवारी दुपारी महालक्ष्मीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक पाहण्यासह दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या मिरवणुकीत हत्ती, घोडे व बँड पथकाचा समावेश होता. तब्बल १४ तास ही मिरवणूक चालली.
दुपारी तीन वाजता सुमारास मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर शशिकला जोल्ले यांच्या हस्ते महालक्ष्मीची मूर्ती सजवलेल्या पालखी ठेवण्यात आली. यावेळी चिंचणी येथील अलंप्रभू स्वामी, चिकोडी येथील संपादना स्वामी, निपाणी येथील प्राणलिंग स्वामी, मल्लिकार्जुन स्वामी, आमदार काकासाहेब पाटील, आशिषभाई शाह, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, राजेश कदम, प्रशांत गुंडे यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
महालक्ष्मीच्या गजरात पालखी मार्गस्थ झाली. मिरवणुकीमध्ये नरसिंहवाडी येथील नाचणारे घोडे, हत्ती, बँड पथक डॉल्बीचा समावेश होता. यावेळी मराठी, हिंदी, कन्नड भाव भक्ती गीतांनी भाविक चिंब झाले. ही मिरवणूक निराळे गल्ली, प्रभात चित्रमंदिर, जिजामाता चौक, दर्गाह कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बेळगाव नाका, साखरवाडी, जुना पी.बी.रोड, राजश्री चित्रमंदिर, अशोक नगर, कित्तूर चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, महादेव मंदिर, कुंभार गल्ली, मुगळे गल्लीमार्ग पहाटे पालखी मिरवणूक मंदिरात पोहोचली.
वरील मार्गावरील सर्वच रस्त्यावर प्रत्येक गल्लीतील नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यासह फुलाच्या पायघड्या घातल्या होत्या. ठीक ठिकाणी भाविकांनी पालखीचे फटाकाच्या आतषबाजीत स्वागत केले. तर महिलांनी पालखीची ओवाळणी करण्यासह पालखीला पाणी घातले. पालखी मिरवणूक पाण्यासह दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी गर्दी केली होती. तब्बल तेरा तास ही मिरवणूक चालू होती.यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्वच रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेतील अनुचित प्रकार वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी चार दिवसापासून शहर ग्रामीण आणि बसवेश्वर चौक पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला आहे.
—-
विविध कार्यक्रम
सोमवारी (ता.१३) सकाळी पंचामृत अभिषेक, पूजा आणि रात्री ७ वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता.१४) सकाळी पंचामृत अभिषेक पूजा व दुपारी कुंकूमअर्चन होणार आहे.
बुधवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
—-
Post Views:
215
Belgaum Varta Belgaum Varta