१६.१० लाखाच्या दुचाकी जप्त
निपाणी (वार्ता) : संशयित रित्या फिरत असताना दोघांना अटक करून चौकशी केली असता त्यांच्याकडून १६ लाख १० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. निपाणी शहर पोलीस ठाण्यांने ही कारवाई केली आहे. लक्ष्मण विरुपाक्ष कणबर्गी (वय २८ रा. अंकलगी, ता. गोकाक) आणि पाजी श्रीकांत राजाप्पगोळ ( वय २३ बन्नीभाग ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मंगळवारी (ता.१४) पहाटे येथील प्रगती नगरातील सुनील चंद्रकांत सांगावकर यांची दुचाकी चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास सुरू असतानाच येथील शिरगुप्पी हद्दीमध्ये वरील संशयित दोघेजण एका दुचाकीवरून जात होते. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी दोघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यात दोघांचीही अधिक चौकशी केली असता त्यांनी प्रगती नगरातील दुचाकीसह इतर २२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
चोरलेल्या सर्व दुचाकी धारवाड, बेळगाव मार्केट पोलीस ठाणे, मारीहाळ पोलीस ठाणे, संकेश्वर पोलीस ठाणे, बैलहोंगल पोलीस ठाणे, निपाणी शहर पोलीस ठाणे परिसरातील आहेत. संशयित आरोपींनी आणखी काही दिवसाची इतरांना विकल्याचा अंदाज असून त्या दृष्टीने पोलीस चौकशी करीत आहेत.
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख, संदीप पाटील, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी मंडल पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद पुजारी, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक एम. जी. मुजावर, आर. जी. दिवटे, एम. बी. कल्याणी, गजानन भोवी, एस. एन. अस्की, यासीनमौला कलावंत व सहकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी कारवाई बद्दल कौतुक केले आहे.
——————————————————————
अंकलगीतील वनविभागात दुचाकी
कणबर्गी आणि राजाप्पगोळ या संस्थेत आरोपींनी दुचाकींची चोरी करून अंकलगी येथील वनविभागाच्या रिकाम्या जागेत खोदकाम करून २२ दुचाकी लपवल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्या दुचाकींची विक्री केली जाणार होती. तत्पूर्वीच निपाणी शहर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta