निपाणी : अज्ञात समाजकंटकाकडून श्री विरुपक्षालिंग समाधी मठ गोशाळेच्या चाऱ्याला आग लावण्यात आली. अशा समाजकंटकाला शोधून कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने बसवेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय आनंदराज कॅरीकट्टी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निपाणी तालुक्यामधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कायदेशीर सल्लागार अॅड. श्री. गणेश गोंधळी बोलताना म्हणाले की, गेली कित्येक वर्षे श्री विरुपक्षालिंग समाधी मठ येथे प. पू प्राणलिंग स्वामीजी यांनी कत्तलखानासाठी जाणाऱ्या गाईंचे रक्षण करून त्यांचे पालनपोषण करण्यासाठी समाधी मठ येथे गोशाळा चालू केली आहे. या गोशाळेमध्ये 150 हून अधिक गाई आहेत. त्यांच्या चाऱ्यासाठी गोसेवक, गोरक्षक आणि गोभक्त यांचा मदतीने गोशाळेमध्ये चारा एकत्र केला जातो. पण जसे समाजात चांगले लोक असतात त्याच पद्धतीने समाज विघातक लोकही असतात. एका समाजकंटकाने दुपारच्या वेळेत येथील चाऱ्याला आग लावली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. पण देवबलवत्तर म्हणून प. पू. प्राणलिंग स्वामीजी आणि मठातील विद्यार्थी यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळला. पण या घटनेचे गांभीर्य ओळखून येथून पुढे असे होवू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे तसेच ज्यांनी हे कृत केले त्याला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी, तसेच पन्नास हजारहून अधिक नुकसान झाले आहे तर शासनाने समाधी मठ गोशाळेसाठी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी निपाणी गोसावे प्रमुख अमरसिंग रजपूत, दीपक बुदिहाळे, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री अजित सादळकर, विजय गोंधळी, अभिजित सादळकर, बजरंग दलाचे युवराज जाधव, आकाश स्वामी, सागर श्रीखंडे, विकास आर्य, विकास बुदिहले तसेच बजरंग दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta