Share
मंडल पोलिस निरीक्षक पाटील : निपाणीत जवान, पोलिसांचे पथसंचलन
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणूक जवळ आली असून या काळात मतदारांना विविध अमिष दाखवण्यासह दमदाटीचे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन मंडल पोलिस निरीक्षक एस सी पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.७)आसाम रायफलचे जवान आणि पोलिसातर्फे शहरातील विविध मार्गावरून पतसंंचलन करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, निवडणूक काळात निपाणी मतदारसंघातील संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास कोणीही कायदा हातात न घेता तात्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क साधावा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून निपाणी शहरासह सीमा भागात विविध ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सर्वच वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात अवैधरीत्या वस्तू व रक्कम बाळगल्यास कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे.
सकाळी बेळगाव नाक्यावरून पथसंंचलनास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी चौक, साठे मार्केट, नरवीर तानाजी चौक, कोठीवाले कॉर्नर, महादेव मंदिर, गुजरी पेठ, गांधी चौक, कित्तूर चन्नम्मा सर्कल, अशोकनगर, निपाणी मेडिकल, धर्मवीर संभाजीराजे चौक, जुना पी.बी. रोड, साखरवाडी, नगरपालिका कार्यालय, बेळगाव नाका मार्गे साडेतीन किलोमीटर संचालन करून पोलीस ठाण्यासमोर सांगता झाली.
या पथसंंचलनामध्ये आसाम रायफलचे १४० जवान, २ कमांडर, १ सहाय्यक कमांडर, चिकोडीचे पोलिस उपाधीक्षक बसवराज यलिगार, मंडल पोलिस निरीक्षक एस.सी. पाटील, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांच्यासह ३० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
Post Views:
708