Share
बसवराज एलिगार ; निपाणीत शांतता कमिटीची बैठक
निपाणी (वार्ता) : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून ही जयंती डॉल्बीमुक्त समाजाला विचाराची प्रेरणा देणारी ठरावी, असे मत चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगर यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, नागरिक आणि निवडणूक अधिकाऱ्यांची शांतता समिती बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
निवडणूक अधिकारी जे. मंजुनाथस्वामी यांनी, कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी होत असताना नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. प्रत्येकाने आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन जयंतीचा कार्यक्रम करण्याचे आवाहन केले.
डॉ. आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारांचा वारसा जपत यंदाची जयंती साजरी केली पाहिजे. आंबेडकरी विचारधारेसह सामाजिक प्रबोधन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
दलित क्रांतीसेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, मोहन घस्ते, सुधाकर माने यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार विजय कडगोळ, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, मंडल पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजय मेत्राणी, किसन दावणे, दीपक शेवाळे, आरेश सनदी, दीपक श्रीखंडे यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
724
Belgaum Varta Belgaum Varta