धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार : शिवापूरवाडी, गजबरवाडी परिसरात प्रचार
निपाणी (वार्ता) : आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण धजदच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत. त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार यांनी केले. शिवापुरवाडी गजबरवाडी परिसरात आयोजित कोपरा सभे प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या राज्य महिला सचिव सुनिता व्होनकांबळे होत्या. त्यांच्या या सभांना मतदार व कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
राजू पोवार म्हणाले, निवडून आल्यानंतर बळीराजाला चांगले दिवस आणण्यासह निपाणी मतदारसंघात मूलभूत सुविधा आणि विकासकामे राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये रस्ते, आरोग्य, पाणी, वीज, शाळा अशा गोष्टींना अधिक महत्त्व देणार आहे. याशिवाय पिकांना हमीभाव, खतांचे दर कमी करणे, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे बी-बियाणे देणे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. कर्नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हायटेक मॉडेल सरकारी शाळा, आधुनिक संगणकीकृत विज्ञान प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय, आधुनिक सभागृह, खेळाचे मैदान, मुलींच्या शिक्षणाला प्राध्यान्य, भविष्यासाठी पूरक क्रिया प्रकल्प, कुशल शिक्षणाचा मार्ग, सुरक्षित शैक्षणिक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न धजदतर्फे केला जाणार आहे.
निपाणी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन विविध अडचणी समजावून घेऊन त्या मार्गी लावण्याचे काम यापूर्वी केले आहे. प्रत्येक गावागावात मला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी सत्ताधारी पक्षाला नागरिक कंटाळले आहेत. कार्यकतें गावागावांत कोपरा सभा आणि घरोघरी प्रचार करत आहेत.
निपाणी मतदारसंघात निवडणूक रिंगणात धनदांडगे असले तरी सर्वसामान्यांची कामे केल्याने सर्व स्तरांतून आपल्याला पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघातील बळीराजा आता जागृत झाला असून, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविलेल्या आणि कर्जमाफी योजना केलेल्या कुमारस्वामी यांच्या धजद पक्षावर विश्वास बसला आहे.
बेरोजगार युवकांसाठी कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करून रोजगार उपलब्ध करणार आहे. याशिवाय महिलांना तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देऊन घरबसल्या उद्योग- व्यवसाय करण्यासाठी कर्जपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय महिलांसाठी विशेष गारमेंट योजना सुरू केली जाणार आहे. विधवा, अपंगांना दर महिन्याला अडीच हजार रुपये वाढीव मानधन, ६५ वर्षावरील ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये देऊन त्यांना दिलासा देणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा, उद्यान, खेळण्यासाठी मैदान, सौरऊर्जा प्रकल्पासह विविध उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे राजू पोवार यांनी स्पष्ट केले. यावेळी रमेश पाटील, कलगोंडा कोटगे यांच्यासह रयत संघटना आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta