नागरिक व्यवसायिकांचे हाल : पूर्व सूचना न देताच वीज पुरवठा ठप्प
निपाणी (वार्ता) : शहरातील बस स्थानक आणि साखरवाडी परिसरात सकाळी ११ वाजता अचानक वीज गायब झाली होती. दुपारी अडीच वाजेपर्यंत वीज न आल्याने गुरुवारी (ता.११) आठवडी बाजाराविषयी व्यापारी व्यवसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. दुपारी अडीच वाजता वीजपुरवठा सुरू होऊन पुन्हा तासभर खंडित करण्यात आला. हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या या अनागोंदी कारभाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच शहरात उन्हाचा पारा वाढत होता. साडेअकरा वाजल्यापासूनच अचानकपणे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे विजेवर चालणारी सर्व यंत्रणा बंद पडल्याने अनेक व्यवसायिक आठवडी बाजारा दिवशी अडचणी सापडले. याशिवाय सरकारी कार्यालयातील कामकाजाचाही खोळंबा झाला. दुपारी अडीच वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात न आल्याने सर्वसामान्य नागरिकांना कुलर, पंख्या विना उकाड्याचा सामना करावा लागला.
त्याबाबत चौकशी करताना संबंधित अधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसापासून बस स्थानक परिसरातील मुल्ला कॉम्प्लेक्स व इतर ठिकाणी रात्रंदिवस काम करीत आहोत. कोणतीच दखल न घेता विनाकारण नागरिक तक्रार करत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी हेस्कॉमकडून कामाच्या वेळी वीज पुरवठा खंडित होणार असल्यास तशी माहिती दिली जाते. पण गुरुवारी अशी कोणतीच माहिती न दिल्याने सर्वसामान नागरिक व व्यवसायिक अडचणीत सापडले. दरवर्षी उन्हाळ्यात कार्यालयातील गलथान कारभारामुळे शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो एकर ऊसाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र आज तागायत त्याची कोणतीच नुकसान भरपाई दिली जात नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पावसाळ्यापूर्वीची कामे करणे आवश्यक असताना वळीव पावसाला सुरुवात झाल्यानंतर या कामाला सुरुवात केल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना विजेपासून दूर राहावे लागत आहे. दुपारी अडीच वाजता आलेली वीज केवळ एक तास देऊन पुन्हा ती बंद करण्यात आली.
तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत योग्य ती दखल घेऊन अधिकाऱ्यांना वेळीच आवर घालण्यासह वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
————————————————————
रात्रभर झोपेचे खोबरे
गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्री आणि पहाटेच्या वेळी वेळीविचा पाऊस येत आहे. त्यामुळे पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित केला जात आहे. पाऊस गेल्यावरही वीज पुरवठा सुरू केला जात असल्याने उकाडख आणि डासामुळे नागरिकांच्या झोपेचे खोबरे होत आहे.
————————————————————-
‘आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एकापेक्षा अधिक विभागात काम करावे लागत आहे. बीएसएनएलसह इतर ठिकाणचे केबल ब्लास्ट झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यासाठी वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याशिवाय आपल्याकडे ग्राहकांचा तक्रारी ऐकण्यासाठी एकापेक्षा अधिक भ्रमणध्वनी असल्याने अडचण होऊन भ्रमणध्वनी उचललेला नाही.’
– अक्षय चौगुले, अभियंते हेस्कॉम, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta